बारामती । न्यूज कट्टा
बारामती शहरातील रुई परिसरातील साईनगर येथे १४ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या स्वीय सहाय्यकांची ही मुलगी असल्याची माहिती मिळत आहे. प्राथमिक परिस्थितीत आत्महत्येची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी मुलीच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, अवनी अजित दशावतारे असं या मुलीचं नाव असून ती इयत्ता नववीत शिकते. शनिवारी रात्री मुलीचे आईसोबत किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्यानंतर ती घरातून बाहेर पडली. बराच वेळ उलटूनही ती घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. तसेच पोलिसांकडे ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान, रविवारी सकाळी साईनगर परिसरात या मुलीचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, मृत्यूच्या कारणाचा तपास सुरू केला आहे.
मुलीने आत्महत्या केली की तिच्या मृत्यूमागे अन्य काही कारण आहे, याबाबत सध्या कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. हत्या असल्याचेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार रोहित पवार बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले. अल्पवयीन मुलीच्या अशा दुर्दैवी मृत्यूने कुटुंबीयांसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाच्या सर्व बाजू तपासल्या जात असून, शवविच्छेदन अहवालानंतर पुढील बाबी स्पष्ट होणार आहेत.





