बारामती । न्यूज कट्टा
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे पीए अजित दशावतारे यांच्या अल्पवयीन मुलीने आत्महत्याच केल्याचं पोलिस तपासात समोर आलं असून आई रागावल्यामुळे तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं स्पष्ट झालं आहे. पाच मजली इमारतीवरून उडी घेत तिने आपलं जीवन संपवल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे. दरम्यान, या घटनेबद्दल हत्या की आत्महत्या याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र आता पोलिसांनी या घटनेचं गूढ उकललं आहे.
याबाबत पोलिस यंत्रणेकडून आज आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. त्यानुसार दि. २२ ऑगस्ट रोजी रात्री संबंधित अल्पवयीन मुलीचा आईशी वाद झाला होता. आईने रागावल्यामुळे ती घराबाहेर पडली. कुटुंबीयांनी शोधाशोध करूनही ती सापडली नाही. त्यामुळे त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनीही या मुलीचा शोध घेतला. परंतु ती मिळून न आल्यामुळे तिचे अपहरण झाल्याच्या संशयातून पोलिसांनी तसा गुन्हा दाखल केला.
दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी पोलिसांना रुई भागातच एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता ती बेपत्ता मुलगी असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेनंतर या मुलीसोबत नेमकं काय घडलं याबाबत मोठ्या चर्चा होत होत्या. आमदार रोहित पवार यांनीही संबंधित मुलीच्या पालकांची भेट घेऊन याबाबत पोलिसांनी तपास करण्याची मागणी केली होती. पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास केल्यानंतर ही आत्महत्याच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दि. २२ ऑगस्ट रोजी रात्री आईसोबत भांडण झाल्यानंतर ही मुलगी शेजारीच असलेल्या एका पाच मजली इमारतीवर गेली. त्या ठिकाणाहून उडी मारत तिने आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या मुलीच्या मृत्यूबद्दल असलेल्या वेगवेगळ्या चर्चांना विराम मिळाला आहे. अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम, बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण पवार, शहरचे पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी हे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.





