BARAMATI CRIME : इन्स्टाग्रामवर ‘भाईगिरी’ करणं भोवलं; हातात पिस्तूल घेऊन रील करणाऱ्या बाबुर्डीतील तरुणावर सुपे पोलिसांची कारवाई

सुपे । न्यूज कट्टा

सोशल मीडियावर लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी हातात शस्त्र घेऊन रील बनवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. इंस्टाग्रामवर पिस्तूलसदृश वस्तू हातात घेऊन प्रक्षोभक आणि धमकीवजा मजकूर असलेला व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी सुपा पोलिसांनी तरुणाविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यासह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सुपा पोलीस ठाण्याच्या सायबर मॉनिटरिंग पथकाला २४ ऑगस्ट २०२६ रोजी एका इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ प्रसारित झाल्याचे निदर्शनास आले. या व्हिडिओमध्ये बाबुर्डी (ता. बारामती) येथील प्रेम प्रताप जगताप हा पिस्तूलसदृश वस्तू हातात घेऊन व्हिडिओ करताना दिसून आला. व्हिडिओवर ‘आलीशान युवा प्रतिष्ठान’ असा मजकूर टाकण्यात आला होता. तसेच, “शांत है इसका मतलब ये नही की हम संत है..! जंगल अपना है, और कानुन भी अपना है” अशा प्रक्षोभक आणि धमकीवजा मजकुराचा वापर करण्यात आला होता.

व्हिडिओच्या ऑडिओमध्येही एखाद्या व्यक्तीवर हल्ला केल्याचा संदर्भ असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचं निदर्शनास आले. त्यानुसार सुपे पोलिसांनी जिल्हादंडाधिकाऱ्यांचे शस्त्रबंदी व जमावबंदीचे आदेश लागू असताना त्याचे उल्लंघन करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी स्वतःहून फिर्याद दाखल केली आहे. प्रेम जगताप याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३५१(२)(३), २२३, भारतीय शस्त्र कायदा कलम ३(२५), तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) व १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रुपेश साळुंके करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, पोलीस हवालदार रुपेश साळुंके, पोलीस शिपाई किसन ताडगे, पोलीस शिपाई महादेव साळुंके व पोलीस शिपाई भाऊसाहेब चौधरी यांच्या पथकाने केली आहे.

तरुणांना पोलिसांचा इशारा

सोशल मीडियावर केवळ व्ह्यूज आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी शस्त्रांचे प्रदर्शन करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. ‘रीलसाठी रिअल आयुष्य धोक्यात घालू नका’, असा इशारा सुपा पोलिसांनी दिला आहे. इंस्टाग्राम, फेसबुकसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आभासी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कोणतीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून पोलिसांनी दिला आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!