पुणे | न्यूज कट्टा
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्लील आणि शिवराळ भाषेत टीका केल्याप्रकरणी पुण्यातील रिलस्टार संतोष पंडित यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर कोथरूड पोलिसांनी बुधवारी रात्री संतोष पंडित यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे.
संतोष पंडित हे पुण्यातील विकासकामांवर तसेच त्यातील त्रुटींवर सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने भाष्य करत असतात. याचदरम्यान त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह, अश्लील आणि शिवराळ भाषेचा वापर करणारी व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीनंतर कोथरूड पोलिसांनी संतोष पंडित यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर बुधवारी रात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास कोथरूड पोलिसांचे पथक त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांना ताब्यात घेत अटक केली.
संतोष पंडित यांच्या अटकेच्या वेळी त्यांच्या कुटुंबीयांनी संपूर्ण कारवाईचे चित्रीकरण केले. पोलिस त्यांना वाहनात बसवत असताना संतोष पंडित यांनी पोलिसांशी संवाद साधला. “माझ्याकडून तुम्हाला त्रास झाला असेल, सहकार्य करत नसेल असं वाटत असेल तर माफी मागतो. अटक केल्याबद्दल धन्यवाद,” असे ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी आपला मोबाईल, गाडीची किल्ली आणि कमरेचा पट्टा काढून कुटुंबीयांकडे दिला. या संपूर्ण कारवाईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, संतोष पंडित हे विविध विकासकामांसह नियमांचं उल्लंघन करणाऱ्या लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांवर सातत्याने प्रश्न उपस्थित करत असल्याने त्यांच्या सोशल मीडिया पोस्टची यापूर्वीही चर्चा झाली होती. मात्र, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात अश्लील आणि शिवराळ भाषेचा वापर केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांचा पुढील तपास सुरू असून, संतोष पंडित यांच्या सोशल मीडिया पोस्ट आणि संबंधित व्हिडीओचीही चौकशी केली जात आहे.
अटकेनंतर स्वत:लाच चापटी मारून घेतल्या
पोलिस अटक करण्यासाठी त्यांच्या घरी आल्यानंतर संतोष पंडित यांनी स्वतः व्हिडीओ तयार केला. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी पोलिसांची कारवाई आणि आपल्याला अटक होत असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली. पोलिस त्यांना घरातून खाली घेऊन येत असतानाचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. विशेष म्हणजे, संतोष पंडित यांना घराखाली आणल्यानंतर त्यांनी स्वतःलाच चापटी मारून घेतल्याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे त्यांच्या अटकेच्या कारवाईची सोशल मीडियावर आणखी चर्चा रंगली आहे.





