बारामती : न्यूज कट्टा
बारामती शहरातील एका डॉक्टरने भूमी अभिलेख कार्यालयाचा बोगस सही-शिक्का वापरुन बांधकाम परवाना मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले असतानाच बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी या बांधकामाची सुधारीत परवानगी दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता संबंधितांवर गुन्हा दाखल करून बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याची आणि मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी सामाजिक कार्यकर्ते मोहसीन पठाण यांनी केली आहे.
बारामती शहरातील डॉ. निखिल दिलीप लोंढे यांनी रुग्णालय बांधकामासाठी बारामती नगरपरिषदेकडून २ सप्टेंबर २०२२ रोजी बांधकाम परवाना मिळवला होता. मात्र या परवान्यासाठी दाखल केलेला नकाशाच बनावट असल्याचे समोर आले आहे. डॉ. लोंढे यांनी भूमी अभिलेख कार्यालयाचा बनावट शिक्का वापरुन हा नकाशा बारामती नगरपरिषदेकडे सादर केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे शासनाची आणि पर्यायाने बारामती नगरपरिषदेचीही फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबत मोहसीन पठाण यांनी संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करून या बांधकामांवर कारवाईची मागणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती. बावनकुळे यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा भूमी अभिलेख अधिक्षकांना दिले होते. त्यानुसार भूमी अभिलेख कार्यालयाने बारामती नगरपरिषदेला लेखी पत्र देत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याबाबत कळवले आहे. मात्र नगरपरिषदेकडून कोणतीच कारवाई झालेली नाही. उलट मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी डॉ. लोंढे यांना सुधारीत परवानगी दिल्याचं समोर आलं आहे.
डॉ. निखिल लोंढे यांनी बांधकाम परवान्यासाठी बनावट नकाशा दिल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे बारामती नगरपरिषदेने याबाबत पत्र दिल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयाकडून तपासणी करण्यात आली. त्यामध्ये डॉ. लोंढे यांच्याकडून नगरपरिषदेची फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले आहे. अशातच मुख्याधिकाऱ्यांनी डॉ. लोंढे यांना सुधारीत परवानगी दिलीच कशी असा सवाल मोहसीन पठाण यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करत पंकज भुसे यांना निलंबित करण्याची आणि संबंधितांवर ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे.





