बारामती | न्यूज कट्टा
बारामती तालुक्यातील एका गावात कोल्ड्रिंक पिण्याच्या बहाण्याने नातेवाईकानेच महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, संबंधित पीडितेचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याची बाब समोर आली आहे. याबाबत माळेगाव पोलिसांनी संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत संबंधित पीडितेने माळेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दि. २९ एप्रिल २०२५ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास तसेच त्यापूर्वीच्या सुमारे १५ दिवसांच्या कालावधीत हा प्रकार घडल्याची तक्रार महिलेने दिली आहे. फिर्यादी आपल्या माहेरी यात्रेनिमित्त गेली असताना तिच्या नात्यातील अभिषेक मुकुंदराव जगताप (रा. ढाकाळे, ता. बारामती, जि. पुणे) याने कोल्ड्रिंक पिण्याच्या बहाण्याने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, आरोपीने अत्याचाराचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये असल्याचे सांगून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या भीतीचा फायदा घेत आरोपीने फिर्यादीच्या सासरी जाऊन वेळोवेळी तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी अभिषेक मुकुंदराव जगताप याच्याविरुद्ध बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माळेगाव पोलिसांनी आरोपी अभिषेक जगताप याला अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास माळेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक ओंबासे, पोलिस नाईक ज्ञानेश्वर सानप हे करत आहेत.





