बारामती : न्यूज कट्टा
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत पोटनिवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने स्टार प्रचारकांची निवड केली असून त्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचाही समावेश आहे. त्यामुळं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी गोपीचंद पडळकर हे बारामतीत येणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. याच संदर्भाने स्वत: पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली असून पक्षानं आदेश दिल्यास आपण बारामतीत प्रचाराला जाऊ असं त्यांनी म्हटलं आहे.
अजितदादांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामतीच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. सुनेत्रा पवार यांच्यासह २३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपने बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची निवड केली आहे. त्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळं पडळकर हे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामतीत येतील का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
गोपीचंद पडळकर यांनी २०१९ साली अजितदादांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत पडळकर यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. त्यानंतर पडळकर हे सातत्याने अजितदादांसह पवार कुटुंबावर टीका करताना दिसले. अगदी अजितदादांनी भाजपसोबत युती केल्यानंतर पडळकर यांची पवार विरोधी भूमिका बदललेली नव्हती. अशातच आता अजितदादांच्या निधनानंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने स्टार प्रचारक म्हणून गोपीचंद पडळकर यांची निवड केली आहे. त्यामुळे पडळकर हे बारामतीत प्रचारासाठी येतात का याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, याबाबत माध्यमांनी विचारणा केल्यानंतर पडळकर यांनी पक्षाने आदेश दिल्यास आपण बारामतीत प्रचारासाठी जाऊ असं सांगितलं. आपण २०१९ साली बारामतीची निवडणूक लढवली आहे. त्यामुळं बारामतीच्या गावागाड्यात आपला चांगला संपर्क आहे. त्यामुळं पक्षानं सूचना केल्यास आपण निश्चित बारामतीत जाऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रचार करू असं त्यांनी म्हटलं आहे.




