पुणे : न्यूज कट्टा
पुणे जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची आज निवड करण्यात आली. त्यामध्ये बांधकाम व आरोग्य सभापतीपदी दीपाली हुलावळे, समाजकल्याण सभापतीपदी जितेंद्र बडेकर, महिला व बालकल्याण सभापतीपदी अंकिता पाटील आणि कृषि व पशूसंवर्धन सभापतीपदी अमोल नलवडे यांना संधी मिळाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार या निवडी बिनविरोध करण्यात आल्या.
पुणे जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी आज बैठक पार पडली. हवेलीचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांच्याकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सुचवलेल्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले. त्यानुसार त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये मावळ तालुक्यातील दीपाली हुलावळे यांची बांधकाम व आरोग्य सभापती, हवेली तालुक्यातील जितेंद्र बडेकर यांची समाजकल्याण सभापती म्हणून, तर इंदापूरच्या अंकिता पाटील यांची महिला व बालकल्याण सभापतीपदी आणि राजगडच्या अमोल नलवडे यांची कृषि व पशूसंवर्धन सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, सुरुवातीला भोर तालुक्यातील विक्रम खुटवड यांना कृषि व पशूसंवर्धन सभापतीपद निश्चित करण्यात आले होते. मात्र त्यांनी हे पद घेण्यास नकार दिला. त्यामुळं काही काळ या निवडीच्या वेळी नाराजीनाट्य पाहायला मिळाले. शेवटी त्यांच्या जागी अन्य सदस्याला संधी देण्यात आली आहे. त्यामुळं भोर तालुक्याला सभापतीपदाची मिळालेली संधी हुकल्याचं पहायला मिळालं.
जिल्हा परिषदेच्या नव्याने निवडून आलेल्या सदस्य मंडळात इंदापूर, मावळ, राजगड आणि हवेली तालुक्याला सभापतीपदाची संधी मिळाली आहे. तर अध्यक्ष व उपाध्यक्षपदी अनुक्रमे दौंड आणि आंबेगाव तालुक्यातील सदस्य विराजमान झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात उर्वरीत तालुक्यांना संधी दिली जाईल असंच सध्याच्या निवडीवरून स्पष्ट झालं आहे.





