PUNE ZP : जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींची उद्या निवड; पदासाठी अनेकांची फिल्डिंग, बारामतीतून कुणाला संधी मिळणार..?

पुणे : न्यूज कट्टा  

पुणे जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती पदाच्या निवडी उद्या गुरुवार दि. 2 एप्रिल रोजी होत आहेत. या पार्श्वभूमीवर अनेकांनी पक्ष नेतृत्वाकडे फिल्डिंग लावली असून संधी कुणाला द्यायची यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्याकडून शिक्कामोर्तब केलं जाणार आहे. आपल्याला संधी मिळावी यासाठी अनेकांनी मुंबईत वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेत प्रयत्न सुरू केले आहेत.

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वीरधवल जगदाळे यांना संधी देण्यात आली. तर उपाध्यक्षपद विवेक वळसे पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. त्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या बांधकाम, पशू संवर्धन, महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण सभापतीपदाची निवड उद्या दि. 2 एप्रिल रोजी होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

वीरधवल जगदाळे हे दौंड तालुक्यातून निवडून आले आहेत, तर विवेक वळसे पाटील हे आंबेगाव तालुक्यातील आहेत. त्यामुळं आता सभापतीपद अन्य तालुक्यांमध्येच दिले जाईल यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. या पदांसाठी बारामती, इंदापूर, भोर, पुरंदर, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, हवेली, शिरूर आदी तालुक्यातील सदस्यांनी इच्छा दर्शवत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी केली आहे. आपल्यालाच संधी मिळावी यासाठी या सदस्यांकडून जोरदार लॉबिंग केलं जात आहे.

अनेक सदस्यांनी सुनेत्रा पवार यांच्यासह खासदार पार्थ पवार आणि अन्य वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेत संधी देण्याची जोरदार मागणी केली आहे. असं असलं तरी जातीय समीकरणे, विधानसभा मतदारसंघनिहाय स्थिती याचा विचार करून ही पदे दिली जातील अशी माहिती मिळत आहे. त्यामुळं सध्या अनेकांनी फिल्डिंग लावली असली तरी अंतिम निर्णय सुनेत्रा पवार यांच्याकडूनच घेतला जाणार आहे. त्यामुळं सध्या तरी कुणाला संधी मिळणार याबाबत स्पष्टता आलेली नाही.

बारामतीच्या वाट्याला काय..?

पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आहे. बारामतीतूनही सहा सदस्य निवडून गेले असून यातील अनेकांनी सभापतीपदासाठी दावा केला आहे. त्यामुळं उद्याच्या निवडीत बारामतीच्या वाट्याला कोणतं सभापतीपद येतं याकडेही लक्ष लागलं आहे. दरम्यान, उद्या सकाळी या पदांसाठी अर्ज दाखल केले जाणार आहेत. जिल्हा परिषदेतच या निवडीचा कार्यक्रम होणार असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार संबंधित सदस्यांचे अर्ज दाखल केले जातील. त्यानंतर नियोजित प्रक्रिया पार पडून सभापती पदाच्या निवडी निश्चित केल्या जाणार आहेत.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!