बारामती : न्यूज कट्टा
IPO गुंतवणुकीच्या नावाखाली १ कोटी ३० लाख रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचा प्रकार बारामतीत उघडकीस आला आहे. या प्रकरणात बारामती शहर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत विविध बँक खात्यातील सुमारे ४४ लाख रुपये फ्रीज करण्यात यश मिळवले आहे. दुसरीकडे या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून या फसवणूक प्रकरणातील सूत्रधारांचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी दिली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, फिर्यादीला “F24 Indian Stock Market Investors Discussion Group” या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यात आले होते. या ग्रुपमधील व्यक्तींनी शेअर मार्केट, IPO आणि ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीला FARLEYLLC नावाचे अॅप डाउनलोड करून खाते उघडण्यास सांगण्यात आले. या अॅपवर खोटा नफा आणि वाढती रक्कम दाखवून वारंवार अधिक पैसे गुंतवण्यास भाग पाडण्यात आले. विश्वास बसल्याने फिर्यादीने वेगवेगळ्या तारखांना विविध बँक खात्यांमध्ये मोठ्या रकमा जमा केल्या. आतापर्यंत १ कोटी ३० लाख रुपये यात गुंतवल्याचे समोर आले आहे.
तपासात ही रक्कम प्रथम काही मध्यस्थ खात्यांमध्ये जमा करून नंतर विविध खात्यांमध्ये वळवण्यात आल्याचे आढळले आहे. काही रक्कम ATM मधून काढण्यात आली असून काही रक्कम विविध माध्यमातून रोख मिळवण्यात आली असून हा संपूर्ण प्रकार नियोजनबद्ध सायबर फसवणूक रॅकेटमार्फत घडवून आणल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे. अटक आरोपींनी ATM द्वारे पैसे काढून काही रक्कम इतर खात्यांमध्ये जमा केल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत पोलिसांनी विविध बँक खात्यातील ४४ लाख रुपये फ्रीज करण्यात यश मिळवले आहे.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अनोळखी WhatsApp ग्रुप, Telegram लिंक किंवा गुंतवणुकीच्या नावाखाली जास्त परताव्याचे आमिष दाखवणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. सायबर फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी केले आहे.
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संदीप जाधव, पोलिस हवालदार सुलतान डांगे, यशवंत पवार, रामचंद्र शिंदे, सागर जामदार, अक्षय सिताफ, सूरज घाटे, विशाल शिंदे, गिरीश नेवसे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.





