NCP BARAMATI : बारामतीत भावनिक वातावरणात राष्ट्रवादीची आढावा बैठक; अजितदादांचं स्वप्न पूर्ण करणार : जय पवार यांचा निर्धार

बारामती : न्यूज कट्टा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती तालुका व शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सेलचे प्रतिनिधी, बूथ कमिटी सदस्य आणि समन्वयक यांची आढावा बैठक आज युवा नेते जय पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवनात पार पडली. अतिशय भावनिक वातावरणात पार पडलेल्या या बैठकीत जय पवार यांनी कार्यकर्त्यांना धीर देत अजितदादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार असल्याचा निर्धार केला.

बारामती येथील राष्ट्रवादी भवनात पार पडलेल्या या बैठकीत माजी राज्यमंत्री संजय बनसोडे, पक्ष निरीक्षक उमेश पाटील, जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, संभाजी होळकर, तालुकाध्यक्ष संदीप बांदल, शहराध्यक्ष किरण इंगळे यांच्यासह सर्व संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत जय पवार यांनी बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा आढावा घेतला. तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, सूचना आणि भावना जाणून घेतल्या. याप्रसंगी अजितदादांच्या जीवणकार्याचा आढावा घेत त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे सामान्य जनतेच्या जीवनातील बदल, झालेली प्रगती आदी बाबींवर प्रकाश टाकण्यात आला. अजितदादांनी विकासकामांमध्ये कधीही पक्षभेद किंवा जातीभेद केला नाही. प्रत्येक गावाचा आणि प्रत्येक घटकाचा समान विचार करून त्यांनी काम केले. त्यामुळेच त्यांच्या आणि सर्वसामान्य जनतेमध्ये भावनिक नाते निर्माण झाले होते अशा भावना यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

जय पवार यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यकर्त्यांमुळे आम्ही आहोत असं दादा सांगायचे.  कार्यकर्त्यांना अजितदादांनी नेहमीच जीवापाड जपण्याचं काम केलं. मीदेखील अजितदादांचाच मुलगा असून त्यांचंच रक्त माझ्या शरीरात आहे. त्यामुळं शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबत असेल अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यकर्त्यांना धीर देतानाच त्यांची कायम साथ देण्याचा शब्द त्यांनी यावेळी दिला.

दादा गेलेत, यावर आजही विश्वास बसत नाही. आज येतील किंवा उद्या येतील, त्यांचा फोन येईल असं वाटत राहतं. पण आज तुमच्यातच मला दादा दिसतात असं सांगत जय पवार काही काळ भावुक झाले. दादा जसे शब्दाचे पक्के होते, तसेच मीही शब्दाचा पक्का आहे असंही सांगायला ते विसरले नाहीत. निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सर्वांचीच भावना आहे, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु कोणी जर निवडणूक लढत असतील, त्याला आपण रोखू शकत नाही. मात्र बारामतीकर मतदानातून त्यांना उत्तर देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘त्या’ विषयावर बोलायचं आहे

अजितदादांच्या अपघाताबाबत अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. याबद्दल बोलताना त्यांनी या विषयावर मला बोलायचं आहे, मात्र अंतिम अहवाल आल्यानंतर यावर स्पष्टपणे बोलणे योग्य राहील असंही त्यांनी सांगितलं. मला जेव्हा या विषयावर बोलायचं होतं त्यावेळी ते मुद्दे पुढे आलेले होते. त्यामुळं नाईलाजास्तव मला थांबावं लागलं. मात्र या प्रकरणाचा अंतिम अहवाल आल्यानंतर आपली भूमिका स्पष्टपणे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!