बारामती । न्यूज कट्टा
बारामती नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत स्वर्गीय लोकनेते तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ३.५ एकर जागेत भव्य आणि जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्याच्या प्रस्तावास एकमताने मंजुरी देण्यात आली. सभागृहातील सर्व सदस्यांनी दादांच्या बारामती, पुणे जिल्हा आणि महाराष्ट्राच्या विकासातील योगदानाचा गौरव करत हे स्मारक भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
नगराध्यक्ष सचिन सातव यांनी प्रस्तावाची माहिती देताना स्मारकाच्या संकल्पनेचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी दादांनी बारामतीच्या प्रगतीचे दर्शन घडवणारा उंच मनोरा उभारण्याचे स्वप्न पाहिले होते, त्याच ठिकाणी आज त्यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दादांची विकासदृष्टी, दूरदृष्टी आणि जनतेशी असलेले नाते कायम स्मरणात राहावे, यासाठी हे स्मारक उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
सभागृहातील चर्चेदरम्यान नगरसेवक नवनाथ बल्लाळ, अमर धुमाळ, सोमनाथ गजकस, गणेश जोजारे आणि जय पाटील यांनी दादांच्या कार्याला साजेसे भव्य, दर्जेदार आणि प्रेरणादायी स्मारक उभारण्याची अपेक्षा व्यक्त केली. हे स्मारक जागतिक दर्जाचे व्हावे आणि बारामतीच्या वैभवात भर घालणारे ठरावे, असे मत सदस्यांनी मांडले.
नगरसेवक अमोल कावळे यांनी प्रस्तावाला पाठिंबा देताना स्मारक सर्वसामान्य नागरिकांसाठी कायम खुले आणि निःशुल्क ठेवावे, अशी मागणी केली. अजितदादा पवार यांनी आयुष्यभर जनतेसाठी आपले दरवाजे खुले ठेवले होते. त्यामुळे त्यांच्या स्मारकासाठी येणाऱ्या नागरिकांकडून कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाऊ नये, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी सांगितले.
स्मारकामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अजितदादा पवार यांच्या जीवनप्रवासाचा माहितीपट, चलचित्रे आणि डिजिटल सादरीकरणाद्वारे आढावा घेण्याची सूचना सदस्यांनी केली. तसेच त्यांच्या सार्वजनिक जीवनाशी संबंधित महत्त्वपूर्ण वस्तू, छायाचित्रे, दस्तऐवज, सन्मानचिन्हे आणि ऐतिहासिक आठवणींचा संग्रह असलेले संग्रहालयही उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
सभागृहातील सर्व सदस्यांनी ठरावास एकमुखाने मंजुरी देत हे स्मारक केवळ स्मृतीस्थळ न राहता स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विचारांचा, विकासदृष्टीचा आणि जनसेवेच्या वारशाचा जिवंत दस्तऐवज ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. बारामतीच्या प्रगतीचा शिल्पकार म्हणून ओळख असलेल्या दादांच्या कार्याची चिरंतन स्मृती जपणारे हे स्मारक भविष्यात लाखो नागरिकांसाठी प्रेरणादायी केंद्र ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.





