ILLEGAL ACADEMY : बारामतीतील बेकायदेशीर अकॅडमींविरोधात बेमुदत धरणे आंदोलन; मुख्याधिकाऱ्यांसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

बारामती । न्यूज कट्टा      

बारामती शहरातील बेकायदेशीर अकॅडमींना नियमबाह्य पद्धतीने दिलेल्या फायर एनओसी रद्द करून त्या सील कराव्यात, बोगस प्रवेश देणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते मोहसीन पठाण यांनी कालपासून बारामती नगरपरिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे.

बारामती शहर आणि परिसरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात अकॅडमींचे पेव फुटले आहे. गुणवत्तेच्या नावाखाली पालकांची लूट करणाऱ्या या अकॅडमींना शासनाची कोणतीही परवानगी नाही. तसेच या अकॅडमीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या शाळांमध्ये बोगस प्रवेश दाखवण्यात आले आहेत. वास्तवात हे विद्यार्थी शाळेत उपस्थितच नसतात. अशा एक ना अनेक तक्रारी मोहसीन पठाण यांनी संबंधित विभागांकडे केल्या आहेत.

दुसरीकडे बारामती नगरपरिषदेच्या तत्कालीन अग्निशमन अधिकारी पद्मनाभ कुल्लरवार यांनी पदाचा दुरुपयोग करत आर्थिक गैरव्यवहार करत शासनाची कोणतीच परवानगी नसणाऱ्या अकॅडमींना बेकायदेशीरपणे सर्रास फायर एनओसी दिल्या आहेत. याबाबत झालेल्या चौकशीत कुल्लरवार हे दोषी आढळले. मात्र अद्याप त्यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. तसेच बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्याकडूनही संबंधित अधिकारी आणि अकॅडमींवर कारवाई केली जात नाही. उलट त्यांच्याकडून दोषी अधिकाऱ्याची पाठराखण केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर मोहसीन पठाण यांनी बारामती नगरपरिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. बारामतीतील बेकायदेशीर अकॅडमींना देण्यात आलेल्या फायर एनओसी रद्द कराव्यात, या अकॅडमी सील कराव्यात, तसेच बोगस प्रवेश दाखवणाऱ्या शाळांच्या मान्यता रद्द कराव्यात आणि या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

बेकायदेशीर अकॅडमींना संरक्षण का..?  

२०२३ पासून आपण या विषयावर लढा देत असताना प्रशासनातील अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप मोहसीन पठाण यांनी केला आहे. वास्तविक या अकॅडमीचालकांकडून शासनाची आणि पालकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. शासनाच्या कोणत्याच विभागाची कायदेशीर परवानगी नसताना या अकॅडमींना संरक्षण देण्यामागे नेमकं गौडबंगाल काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. या मागण्यांबाबत निर्णय न झाल्यास यापुढील काळात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

पालकांनो जागे व्हा..!

दरम्यान, पालक मोठ्या आशेने आपल्या मुलांना या अकॅडमीत प्रवेश घेतात. वास्तवात या अकॅडमींकडून विद्यार्थ्यांच्या शिक्षणापेक्षा वशिलेबाजीला अधिक महत्व दिले जाते. त्यातून विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष प्रगती होत नाही. परिणामी अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळं पालकांनी आताच जागृत होऊन या बेकायदेशीर अकॅडमींच्या विरोधात सुरु असलेल्या या आंदोलनात सहभाग घ्यावा असे आवाहनही मोहसीन पठाण यांनी केले आहे.

अजितदादांची आठवण

या आंदोलनाच्या निमित्तानं मोहसीन पठाण यांनी एक फलक हातात घेत आंदोलनाकडे लक्ष्य वेधले. त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पुतळ्यास अभिवादन करत ‘आज दादा आपल्यात असते तर बारामतीकरांवर अशी वेळ आली असती का..?’ हा मजकूर असलेला फलक हाती घेऊन प्रशासनाला सवाल केला. या अकॅडमी बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट असतानाही निर्ढावलेले प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

मुख्याधिकारी पंकज भुसे यांची चौकशी  

यापूर्वी मोहसीन पठाण यांनी बारामतीचे मुख्याधिकारी पंकज भुसे हे अकॅडमीवरील कारवाईत टाळाटाळ करत असल्याची आणि दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याबाबत तक्रार केली होती. या दरम्यान, त्यांनी बारामतीत  सह्यांची मोहीम राबवत मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. या तक्रारीची दखल घेत नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या सह आयुक्त डॉ. चारुशीला पंडित यांनी मुख्याधिकारी पंकज भुसे यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश नगरपरिषद प्रशासनाला दिले आहेत.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!