BIG BREAKING : बारामतीत लाचखोरीत अडकलेल्या नगररचना अधिकाऱ्याकडे आढळली बेहिशोबी मालमत्ता; अधिकाऱ्यासह पत्नीवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे । न्यूज कट्टा      

नगररचना विभागातील सहाय्यक नगररचनाकार म्हणून कार्यरत असलेल्या आणि बारामतीत लाचखोरीच्या प्रकरणात अडकलेल्या विकास किसन ढेकळे या अधिकाऱ्यासह त्याच्या पत्नीवर बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चौकशीत या दांपत्याकडे ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत तब्बल २ कोटी ७८ लाख ४१ हजार ५४२ रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली आहे.

विकास ढेकळे हा अधिकारी बारामतीत कार्यरत असताना मार्च २०२५ मध्ये १ लाख रुपयांची लाच घेताना त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. तत्पूर्वी १९ जून २०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई मुख्यालयातून उघड चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर १७ ऑगस्ट १९९९ ते २० मार्च २०२५ या कालावधीतील आर्थिक व्यवहारांची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये दीर्घ कालावधीतील आर्थिक व्यवहार, उत्पन्न, खर्च आणि मालमत्तेची सखोल चौकशी करण्यात आली.

या चौकशीदरम्यान ढेकळे याच्या कायदेशीर उत्पन्नाची आणि त्याच्या नावावर तसेच कुटुंबाच्या नावावर असलेल्या मालमत्तेची तुलना करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा १८.४७ टक्के अधिक मालमत्ता असल्याचे आढळून आले. एकूण २ कोटी ७८ लाख ४१ हजार ५४२ रुपयांची मालमत्ता बेहिशोबी असल्याचे तपासात समोर आले आहे. दुसरीकडे, या प्रकरणात विकास ढेकळे याच्या पत्नीची भूमिकाही तपासण्यात आली. त्यामध्ये बेहिशोबी पैसा जमा करण्यात पत्नीने या अधिकाऱ्याला मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

चौकशीदरम्यान, समितीची दिशाभूल करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून ती तपास यंत्रणेसमोर सादर केल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक मनीषा झेंडे यांनी केला. दीर्घ कालावधीतील उत्पन्न, खर्च आणि मालमत्तेची पडताळणी केल्यानंतर विकास ढेकळे आणि त्याची पत्नी भाग्यश्री या दांपत्याविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, विकास ढेकळे या अधिकाऱ्याला यापूर्वी बारामतीत लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर आता बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणामुळे हा अधिकारी पुन्हा चर्चेत आला आहे. या अधिकाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात माया जमवल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पुढे काय कारवाई होणार आणि ढेकळे याच्या छुप्या मालमत्तेची तपासणी होणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!