बारामती । न्यूज कट्टा
बारामती शहरानजीक असलेल्या तांदुळवाडी येथील दादा पाटीलनगर परिसरात शुक्रवारी (२१ ऑगस्ट) माय-लेकाचा दुर्दैवी आणि संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. १७ वर्षीय मुलाने घरातील अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले, तर त्याची ४१ वर्षीय आई घरातील खिडकीजवळ मृतावस्थेत आढळली. आईच्या गळ्यावर काळसर व्रण आढळल्याने या घटनेचे गूढ अधिकच वाढले असून, बारामती तालुका पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, विजय रामदास गावडे हे गुरुवारी (२० ऑगस्ट) रात्री कामानिमित्त रात्रपाळीला गेले होते. शुक्रवारी सकाळी काम संपल्यानंतर ते तांदुळवाडी येथील घरी परतले. घराचा दरवाजा ठोठावून त्यांनी पत्नी रमा आणि मुलगा विवेक यांना आवाज दिला. मात्र, घरातून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा आतून बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना संशय आला. यानंतर विजय गावडे यांनी शेजारी राहणारे सुरज भिमराव शिंदे यांना मदतीसाठी बोलावले. दोघांनी मिळून घराचा दरवाजा उघडला असता आतचे दृश्य पाहून त्यांना धक्का बसला.
मुलाचा गळफास, आई खिडकीजवळ मृतावस्थेत
घरातील एका खोलीत १७ वर्षीय विवेक विजय गावडे हा अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच खोलीत त्याची आई रमा विजय गावडे या खिडकीजवळ पाठीवर पडलेल्या अवस्थेत दिसून आल्या. विजय यांनी पत्नीला उठवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्याकडून कोणतीही हालचाल होत नव्हती. त्यांच्या गळ्यावर काळसर रंगाचे व्रणही दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक हनुमंत वायसे यांनी बारामती तालुका पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. नातेवाईक आणि पोलिसांच्या मदतीने रमा गावडे व विवेक गावडे यांना बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
विवेकने आत्महत्या का केली आणि रमा गावडे यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आईच्या गळ्यावर आढळलेल्या व्रणामुळे पोलिसांकडून विविध शक्यता तपासल्या जात आहेत. हा आत्महत्येचा प्रकार आहे की अन्य काही घटना घडली आहे, याचा तपास सुरू आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस घटनास्थळावरील परिस्थिती, उपलब्ध पुरावे आणि इतर सर्व बाबींच्या आधारे तपास करत आहेत. या घटनेमुळे बारामतीत एकच खळबळ उडाली असून, गावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.





