BIG BREAKING : आता सुटे खाद्यतेल विकता येणार नाही, उल्लंघन केल्यास जन्मठेपेपर्यंत शिक्षा; तुकाराम मुंडे यांनी जाहीर केली नवी नियमावली

मुंबई । न्यूज कट्टा

दूध, पनीर, हॉटेलमधील खाद्यपदार्थ आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थांमधील भेसळीवर कारवाई केल्यानंतर आता अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आपला मोर्चा खाद्यतेलकडे वळवला आहे. ‘सेव्ह फूड, सेव्ह ड्रग, सेव्ह महाराष्ट्र’ या मोहिमेंतर्गत खाद्यतेलासंदर्भात कडक नियमावली जाहीर करत त्यांनी विक्रेते आणि उत्पादकांना गंभीर इशारा दिला आहे.

तुकाराम मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, खाद्यतेलाच्या तपासणीदरम्यान स्टँडर्डमध्ये अनियमितता आणि भेसळीचे प्रकार आढळून आले आहेत. राज्यात नोंदणी नसलेल्या खाद्यतेल उत्पादक कंपन्या असल्याचेही तपासात समोर आले आहे. विशेषतः मोहरीच्या तेलात अनधिकृत मिश्रण केले जात असल्याचे आढळले आहे. तसेच मुदत संपलेल्या तेलाचे पुन्हा रिपॅकिंग केल्याचे प्रकारही समोर आले आहेत.

आता सुट्या स्वरूपात खाद्यतेलाची विक्री करता येणार नाही. किरकोळ विक्रेत्यांनाही केवळ पॅकेजिंगमधील खाद्यतेलाची विक्री करता येणार आहे. मोहरीचे तेल १०० टक्के मोहरीचेच असणे आवश्यक असून, त्यामध्ये कोणतेही अनधिकृत मिश्रण करता येणार नाही. खाद्यतेलाचे टिन डबे पुन्हा वापरण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारावर बंदी असतानाही त्याचे उल्लंघन होत आहे. याशिवाय तळणीचे तेल वारंवार वापरले जात असल्याचेही अनेक कारवायांमध्ये आढळून आले आहे. हे प्रकार नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारे असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले.

खाद्यतेलाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास ७ वर्षांपासून आजन्म कारावासापर्यंतची शिक्षा होऊ शकते. भेसळ केल्यास १० लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. तसेच दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठीही १० लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. महाराष्ट्रातील सर्व खाद्यतेल विक्रेते आणि उद्योगांना ही नियमावली लागू असणार आहे. यासाठी ४९६ सेंट्रल लायसन्स रजिस्टर असल्याची माहितीही तुकाराम मुंडे यांनी दिली.

तुकाराम मुंडे यांनी नागरिकांना सुटे तेल खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. पॅकेज्ड तेल घेताना लेबल, सील आणि एक्सपायरी डेट तपासावी. तसेच तळणीचे तेल वारंवार घरात वापरू नये आणि हॉटेलमध्येही वारंवार वापरलेले तेल असल्याचा संशय असल्यास तेथील खाद्यपदार्थ खाणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!