INDAPUR BREAKING : इंदापूरमध्ये बेकायदेशीर मांगूर माशाचे संवर्धन; कालठणमध्ये मिळाला मांगूरचा साठा, हनुमंत जाधवसह दोघांवर गुन्हा दाखल

इंदापूर । न्यूज कट्टा

मानवी आरोग्यास घातक असलेल्या मांगूर माशाचे बेकायदेशीरपणे पालन केल्याप्रकरणी इंदापूर तालुक्यातील कालठण येथील हनुमंत जाधव आणि अन्य एकावर इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील काही वर्षात या परिसरात मोठ्या प्रमाणात मांगूर माशांचे पालन केले जात असल्याची आणि त्याचे केंद्र कालठण परिसरातून चालवले जात असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर मत्स्य व्यवसाय विभागाच्या कारवाईत मोठा साठा आढळून आला असून या प्रकरणातील मास्टरमाईंडला अटक करून त्यांची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी तक्रारदार मोहसीन पठाण यांनी केली आहे.

याबाबत मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी राजेंद्र राठोड यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हनुमंत जाधव आणि विजय संजीवन पाडुळे (दोघेही रा. कालठण, ता. इंदापूर) या दोघांवर भारतीय न्याय संहिता कलम ३(५), अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ चे कलम ५९ व पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ चे ३,५,१५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, दि. २८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कालठण नं. १ येथील गट क्रमांक ९८/४ मधील १.२० हेक्टर क्षेत्राच्या शेतात मांगूर माशांचे बेकायदा संवर्धन सुरू असल्याचे आढळून आले.

हे शेत विजय संजीवन पाडुळे यांच्या मालकीचे असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मांगूर माशांच्या संवर्धनामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो, तसेच या माशांचे सेवन केल्याने मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे माहिती असतानाही त्यांचे संवर्धन केले जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानुसार इंदापूर पोलिसांनी विजय पाडुळे आणि हनुमंत जाधव या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या संपूर्ण रॅकेटचा मास्टरमाईंड हनुमंत जाधव हाच असून पोलिसांनी तात्काळ त्याला अटक करून त्याची सखोल चौकशी करून पुढील कारवाई करावी अशी मागणी तक्रारदार मोहसीन पठाण यांनी केली आहे. मानवी आरोग्याबरोबरच निसर्गाला हानीकारक असलेल्या मांगूर माशांचे बेकायदेशीरपणे पालन करून तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे असून पोलिस आणि मत्स्य व्यवसाय विभागाने या बेकायदेशीर कृत्याचा समूळ नायनाट करावा अशीही मागणी त्यांनी केली आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!