INDAPUR CRIME : उजनी धरण पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; हजारो किलो प्रतिबंधित मागूर मासा जप्त, बेकायदेशीर रॅकेटला मोठा धक्का

इंदापूर | न्यूज कट्टा

इंदापूर तालुक्यातील उजनी धरण परिसरात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या मागूर (Clarias gariepinus) माशाच्या बेकायदेशीर पालन, वाहतूक आणि साठ्यावर इंदापूर पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत हजारो किलो प्रतिबंधित मासा जप्त केला. बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कारवाईमुळे उजनी परिसरातील बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

दि. ९ जुलै २०२६ रोजी सामाजिक कार्यकर्ते मोहसिन पठाण यांनी मुख्यमंत्री, मत्स्यव्यवसाय विभाग, पर्यावरण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. इंदापूर तालुक्यात प्रतिबंधित मागूर माशाचे बेकायदेशीर पालन, वाहतूक आणि तस्करी सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी तक्रारीत केला होता. संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करून हा अवैध व्यवसाय तात्काळ बंद करण्याची मागणीही करण्यात आली होती.

तक्रारीनंतर पोलिसांनी उजनी परिसरात गुप्त माहितीच्या आधारे विशेष मोहीम राबवत धडक कारवाई केली. या कारवाईत हजारो किलो प्रतिबंधित मागूर मासा जप्त करण्यात आला असून, संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या या माशाच्या अनधिकृत पालनामुळे स्थानिक जलचर जैवविविधतेला धोका निर्माण होतो. तसेच पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही हा प्रकार गंभीर मानला जात असल्याने प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, उजनी परिसरात सुरू असलेल्या या बेकायदेशीर व्यवसायावर पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेचे नागरिकांनी स्वागत केले आहे. पर्यावरणाची हानी करणारे आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारे असे अवैध उद्योग कायमस्वरूपी बंद करण्यासाठी अशाच सातत्यपूर्ण कारवाया व्हाव्यात, तसेच या प्रकरणातील मास्टरमाईंडचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रांताधिकाऱ्यांचेही कारवाईचे आदेश

मोहसीन पठाण यांनी केलेल्या तक्रारीनंतर प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनीही संबंधित बेकायदेशीर व्यवसायावर कारवाई करण्याचे निर्देश पोलिस यंत्रणेला दिले होते. या तक्रारीची दखल घेऊन संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून स्थानीक पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!