इंदापूर । न्यूज कट्टा
इंदापूर तालुक्यातील कालठण परिसरात मोठ्या प्रमाणात मच्छी तळ्यातून मांगूर माशाचे उत्पादन घेऊन तस्करी केली जात आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते मोहसीन पठाण यांच्या तक्रारीनंतर मत्स्य विभाग, पाटबंधारे विभाग, प्रदूषण नियंत्रण विभागासह पोलिस आणि महसूल यंत्रणेने संयुक्त कारवाई करत बेकायदेशीर मच्छी तळ्यांवर धाड टाकण्यास सुरुवात केली आहे. काल या पथकाने संयुक्त कारवाई करत कालठण परिसरात ही कारवाई केली. त्यात मोठ्या प्रमाणात मांगूर मासा मिळून आला आहे.
मानवी आरोग्यासह शेतीलाही मारक असलेल्या मांगूर माशाचे इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊन त्याची तस्करी केली जात असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते मोहसीन पठाण यांनी केली होती. मांगूर माशाचे उत्पादन घेण्यास राष्ट्रीय हरित न्यायाधिकारणाने बंदी घातली आहे. तरीदेखील इंदापूर परिसरात मांगूर माशाचे उत्पादन होत असल्याबाबत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानुसार मागील महिन्यात मत्स्य विभाग आणि इंदापूर पोलिसांनी कारवाई करत तब्बल सहा टन मांगूर मासे जप्त केले होते.
दरम्यानच्या काळात, पाटबंधारे विभागाने परिसरातील मच्छी तळी रिकामी करण्याच्या नोटीसा संबंधितांना दिल्या होत्या. त्यानंतर काल दि. १९ ऑगस्ट रोजी मत्स्य विभाग, पाटबंधारे विभाग, प्रदूषण नियंत्रण विभागासह पोलिस आणि महसूल यंत्रणेने तक्रारदार मोहसीन पठाण यांच्या उपस्थितीत कालठण परिसरातील बेकायदेशीर मच्छी तळ्यांवर धाड टाकली. यामध्ये मोठ्या प्रमाणात मांगूर मासे मिळून आले आहेत. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात मांगूर माशांचे उत्पादन होत असल्याच्या तक्रारीला पुष्टी मिळाली आहे.
याबाबत संबंधित विभागाकडून इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्यादही देण्यात आली आहे. त्यानुसार इंदापूर पोलिसांनी मांगूर माशाचे उत्पादन घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे मांगूर तस्करांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, या कारवाईत पुढेही सातत्य ठेवून परिसरातील तळ्यांवर धाड टाकली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे या परिसरात १०० हून अधिक तळ्यांमध्ये मांगूर माशाचे उत्पादन घेतले जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.





