पुणे : न्यूज कट्टा
पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रवेश करत एका युवतीने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. एका जिल्हा परिषद सदस्यावर या युवतीने गंभीर आरोप केले असून त्यातूनच हे पाऊल उचलल्याचं म्हटलं आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित युवतीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
पुणे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज पार पडली. या दरम्यान, एका युवतीने सभागृहात प्रवेश करत अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्या ठिकाणी असलेल्या सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी प्रसंगावधान राखत या युवतीला रोखले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर पोलिसांनी या युवतीला ताब्यात घेत खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
या युवतीने एका जिल्हा परिषद सदस्यावर गंभीर आरोप केले आहेत. लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केली जात असल्याचा आरोप या युवतीने केला आहे. याबाबत गेले अनेक महिन्यांपासून पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने हे पाऊल उचलल्याचे या युवतीने म्हटले आहे. दरम्यान, या घटनेदरम्यान, रुपाली ठोंबरे पाटील याही घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
दरम्यान, या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून आत्महत्येचा प्रयत्न करणारी युवती ही राष्ट्रवादीची पदाधिकारी आहे. विशेष म्हणजे, गेल्या अनेक दिवसांपासून संबंधित जिल्हा परिषद सदस्य आणि युवतीतील वाद सुरू आहेत. यावर कोणताच तोडगा न निघाल्यामुळे आजची खळबळजनक घटना घडली आहे. याबाबत अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती पुढे येत आहे.




