CRIME NEWS : प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत; पतीचे अनैतिक संबंध आणि सततच्या वादामुळे विवाहितेची आत्महत्या, पतीसह प्रेयसीवर गुन्हा दाखल

पुणे | न्यूज कट्टा

प्रेमविवाह करून संसाराची सुरुवात केलेल्या २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील उरुळी देवाची परिसरात घडली आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी मृत विवाहितेच्या पतीला अटक केली असून, त्याच्यासह त्याच्या प्रेयसीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत विवाहितेचे नाव वृषाली भीमराव आरडे ऊर्फ वृषाली रोहित घोडे (वय २५) असे आहे. या प्रकरणी तिचे पती रोहित मच्छिंद्र घोडे आणि त्याची कथित प्रेयसी तृप्ती वाकचौरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वृषालीची आई लक्ष्मी आरडे (रा. इंदापूर) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वृषाली आणि रोहित यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर काही काळ ते बारामती येथे वास्तव्यास होते. त्यानंतर रोजगाराच्या निमित्ताने दोघे पुण्यात आले आणि मागील दोन वर्षांपासून उरुळी देवाची येथील वैष्णव सिटी परिसरात भाड्याने राहत होते. रोहित हा एका खासगी सुपरमार्केटमध्ये नोकरी करत होता.

या दरम्यान,  रोहितचे त्याच कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळल्याचा आरोप आहे. या विवाहबाह्य संबंधांची माहिती वृषालीला मिळाल्यानंतर पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद होऊ लागले. पतीकडून मानसिक त्रास होत असल्याने वृषाली तणावात होती. या त्रासाला कंटाळून तिने दि. २७ जून रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच फुरसुंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान वृषालीच्या मोबाईल फोनमध्ये तिने लिहिलेली एक चिठ्ठी आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. या चिठ्ठीत आपल्या मृत्यूस पती आणि त्याची प्रेयसी जबाबदार असल्याचा उल्लेख असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी मोबाईल जप्त करून त्यातील माहितीच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास फुरसुंगी पोलीस करत असून, जप्त करण्यात आलेल्या डिजिटल पुराव्यांची पडताळणी सुरू आहे. न्यायवैद्यकीय आणि तांत्रिक तपास अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!