BARAMATI DOCTORS : बारामतीच्या डॉक्टरांचं चाललंय काय..? आधी स्त्रीबीज तस्करी प्रकरणातील कनेक्शन, आता शासकीय रुग्णालयाच्या बनावट शिक्क्याचा वापर

बारामती : नविद पठाण, न्यूज कट्टा  

बारामतीत आज शासकीय रुग्णालयाच्या शिक्क्याचा वापर करून बनावट प्रमाणपत्र दिल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी डॉ. पांडुरंग गावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे मागील आठवड्यात बदलापूर येथील स्त्रीबीज तस्करी प्रकरणात बारामतीतीलच चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचं नाव आलं होतं. आठवड्याभरात बारामतीच्या दोन डॉक्टरांची प्रकरणं बाहेर आल्यामुळं बारामतीच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून त्याचा भुर्दंड प्रामाणिक काम करणाऱ्या डॉक्टरांना सोसावा लागत आहे.

मागील आठवड्यात बदलापूर येथे स्त्रीबीज तस्करीचं प्रकरण उजेडात आलं. या प्रकरणाचे धागेदोरे थेट बारामतीतील चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरशी जोडले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर बदलापूर पोलिसांकडून या रुग्णालयाला चौकशीसाठी हजर राहण्याबद्दल नोटीसही बजावण्यात आली आहे. तसेच या रुग्णालयातून आवश्यक माहिती आणि कागदपत्रेही पोलिसांकडून घेण्यात आली आहेत. त्यामुळं पुढे चौकशीत या रुग्णालयाच्या सहभागाबद्दल पूर्णपणे स्पष्टता येणार आहे.

या घटनेला आठ दिवस उलटत नाहीत तोच बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली शासकीय रुग्णालयाचा शिक्का तयार करून त्याद्वारे एका रुग्णाला बोगस प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी डॉ. पांडुरंग गावडे यांच्यावर आज बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शासनाच्या सेवेत नसताना सेवेतील पदाचा उल्लेख असलेला शिक्का मारून डॉ. गावडे यांनी बनावट प्रमाणपत्र देत शासनाची फसवणूक केली. त्यामुळं सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

मागील काही वर्षात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे बारामतीचं नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढले असून शहरही मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. त्यामुळं बारामतीत वैद्यकीय सुविधाही मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या असून खासगी रुग्णालयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरातील विशिष्ट भागात मोठ्या संख्येनं रुग्णालयाच्या इमारती उभ्या राहिल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये स्थानिकांसह परगावातील डॉक्टरांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

आरोग्य सुविधा वाढत असतानाच शहरात टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या संख्येतही लक्षणीय वाढ झालेली आहे. रुग्णांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्या जाहिरातींबरोबरच वेगवेगळे फंडे या रुग्णालयांकडून वापरले जातात. त्याच पद्धतीने रुग्णांकडून भरमसाठ शूल्कही आकारलं जात असल्याचं बोललं जातं. असं असतानाच बदलापूरमध्ये स्त्री बीज तस्करीचं मोठं प्रकरण समोर आलं असून त्याचं बारामती कनेक्शन उजेडात आलं आहे. येथील चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या चालकांना चौकशीसाठी बदलापूर पोलिसांनी नोटीस दिली आहे.

वास्तविक बारामतीत अनेक नामवंत डॉक्टर वर्षानुवर्षे कार्यरत आहेत. प्रामाणिकपणे रुग्णांना सेवा देऊन अनेकांनी प्रगती केली आहे. मात्र मागील आठवड्यातील स्त्री बीज प्रकरणातील बारामती कनेक्शन आणि आजचं बनावट प्रमाणपत्राचं प्रकरण यामुळं बारामतीतील वैद्यकीय क्षेत्राबद्दल उलटसुलट चर्चा होऊ लागल्या आहेत. त्याचा परिणाम इतर प्रामाणिक वैद्यकीय व्यावसायिकांना सोसावा लागत आहे. त्यामुळं त्यांना प्रचंड मनस्ताप होऊ लागला असून अशा प्रकरणात तात्काळ चौकशी होऊन थेट कारवाई होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!