BIG BREAKING : इमारतीच्या पूर्णत्व दाखल्यासाठी मागितली दोन लाखांची लाच; प्रांताधिकाऱ्यासह लिपिकाला रंगेहाथ पकडलं

मंचर : न्यूज कट्टा

इमारतीच्या पूर्णत्व दाखल्यासाठी २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना जुन्नरचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं ही कारवाई करत गोविंद शिंदे यांना ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे, प्रांताधिकाऱ्यासोबत एका लिपिकालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. वरिष्ठ अधिकारीच लाच स्वीकारताना जाळ्यात अडकल्यामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून महसूल विभागातील लाचखोरीचा विषय चर्चेत आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तक्रारदाराने आपल्या इमारत बांधकाम पूर्ण झाल्याचा दाखला मिळवण्यासाठी जुन्नरच्या प्रांताधिकारी कार्यालयात प्रस्ताव दाखल केला होता. त्यासाठी ते वारंवार पाठपुरावा करत असताना काम पूर्ण करून देतील, त्यासाठी ठराविक रक्कम द्यावी लागेल अशी मागणी तक्रारदाराकडे करण्यात आली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधत लाचेची मागणी होत असल्याबाबत तक्रार केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या तक्रारीची शहानिशा करण्यात आली. त्यानंतर आज मंचर येथील कार्यालयात सापळा रचून प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्यासह एका लिपिकाला २ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं. या प्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, वरिष्ठ अधिकारीच लाच घेताना सापडल्यामुळे महसूल विभागातील लाचखोरीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विविध कामांसाठी महसूल विभागाकडून अडवणूक करून मोठ्या प्रमाणात लाच स्वीकारली जात असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळं आता याबाबत प्रशासनाकडून ठोस कारवाई केली जाणार की नेहमीप्रमाणे लाचखोरांना अभय मिळणार याकडे सर्वसामान्य जनतेचं लक्ष लागले आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!