SHOCKING CRIME : बारामतीच्या पती-पत्नीचा कर्नाटकात वाद; भररस्त्यात पत्नीचा गळा चिरला मग कारखाली चिरडत केला खून, पती अटकेत

कलबुर्गी, कर्नाटक : न्यूज कट्टा

देवदर्शनासाठी जात असताना प्रवासादरम्यान झालेल्या वादातून पतीनेच पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात उघडकीस आली आहे. बारामती येथील दाम्पत्य गाणगापूर येथे दर्शनासाठी जाताना ही धक्कादायक घटना घडली असून पतीने आधी पत्नीचा गळा चिरून नंतर गाडीखाली चिरडत खून केल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

शैला (वय २८) असे मृत महिलेचे नाव असून संशयित पती अक्षय जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, जाधव दाम्पत्य देवदर्शनासाठी कर्नाटकात गेले होते. गाणगापूरकडे जात असताना बल्लुरगी परिसरात दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की अक्षयने पत्नीला कारमधून बाहेर ओढून बेदम मारहाण केली.

एवढ्यावरच न थांबता अक्षयने धारदार शस्त्राने शैलाचा गळा चिरला. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीवरून त्याने कार चालवत तिला चिरडले. या भीषण घटनेत शैलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यामध्ये पीडित महिला मदतीसाठी आक्रोश करताना दिसत आहे.

याबाबत कलबुर्गी पोलिसांनी गुन्हा दाखल करत अक्षयला अटक केली आहे. चारित्र्याच्या संशयावरून अक्षयने पत्नीची कट रचून हत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृत शैला आणि आरोपी अक्षय हे मूळचे बारामती (जि. पुणे) येथील रहिवासी असून त्यांच्या लग्नाला अवघी चार वर्षे झाली होती. या घटनेने बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!